मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

शिवप्रताप - A Management

सगळ्यांना माहित आहेच की शिवप्रताप दिन म्हणजे ज्या दिवशी शिवरायांनी अफझुल खान ह्या आदिलशाही सरदाराला ठार मारले. शिवरायांची प्रत्येक मोहीम हि अशीच कठीण आणि परीक्षा घेणारी होती.कारण चारी बाजूनी प्रत्येक जण बळकट आणि सत्ताधारी होता, त्यात नुकतेच कुठे स्वराज्य बाळसं धरू लागले होते. त्या वेळच राजकारण म्हणजे आपल्या राज्याच्या सीमा वाढविणे आणि त्यात दख्खन भागात शिवरायांचा स्वराज्याचा प्रयोग चांगलाच रुळला होता, लोकांची साथ होती. अश्या वेळेस मग राज्यवार चाल करून आलेला शत्रू हा राज्य बुडवण्यास येत आहे की साक्षात राजाला बुडवण्यास येत आहे ह्याची इत्यंभूत माहिती राजाला असणे गरजेचे होते..
तर हा असा आदिलशाही सरदार अफझुल शिवरायांना ठार मारून इथे आणेन अशी प्रतिज्ञा करून विजापूर दरबारातून बाहेर पडला, सोबत खूप सारे सैन्य आणि त्याकरिता लागणारा खजिना घेऊनच..
अफझुल हा देखील त्या काळातील पराक्रमी आणि तितकाच क्रूर असा सेनानी होता, तो निघाला खरा पण त्याने अभ्यास देखील तेवढाच केलेला होता.
त्याने सर्वात आधी शिवरायांचे आणि शहाजीराजांचे जे विरोधक आणि शत्रू आहेत त्यांना आपल्यासारखे करून घेतले. आणि मग त्याने सुरवात केली मोहिमेला.
कट्टर धर्माभिमान आणि धर्माचा अभिमान ह्या दोन संकल्पना आपल्याला शिवचरित्रातील ह्या भागात पाहायला मिळतात..
अफझुल ने प्रजेला लुटले मंदिरं फोडली नको नको ते केलं, का तर त्याचे म्हणणे असे की राजा हा हिंदू आहे आणि देवळं फोडली कि तो स्वतःहून युद्धात उतरेल आणि मोकळ्या जागेवर झालेल्या लढाईत आपण शिवाजी राजा ला हरवू..
पण राजाचे मुख्य ध्येय आणि धर्म काय तर राज्य चालवणे आणि टिकवणे त्यासाठी मग कोणतीही किंमत द्यावी लागली तरी चालेल, शिवरायांनी तेच केलं.
त्यात अफझुल खान हा वाई प्रांताचा सुभेदार होता, त्यामुळे तेथील बहुतेक सर्व माहिती त्याला होतीच.
त्याने सर्व देशमुख आणि देशपांडे (हि सर्व पदं आहेत) आपल्या बाजूने वळवून घेतले..
आता ह्या सर्वांत शिवराय काय करत होते ? तर ते प्रत्येक गडकोटांची व्यवस्था लावत होते. सोबत असलेल्या लोकांशी बोलून त्यांचे मनोबल वाढवत होते.
राजकीय वकील रोज नवनवीन मुद्दे घेऊन चर्चा केल्या जात होत्या..
ह्या सर्व चर्चा ह्या बंद दाराआड होत असत, कारण राजकीय व्यूह हे भर सदरेत घ्यायचे नसतात.
ह्या सर्व गोष्टी इथे सांगण्याचं कारण हेच, कि आजकाल आपणांस जे मॅनेजमेंट चे धडे दिले जातात ते सर्व इथे अगदी सविस्तर पणे पाळले गेले..
लष्कर
दप्तर
राजकारण
समाजकारण
कोणत्याही क्षेत्रात जाऊन स्वराज्यकाळातील कोणतीही घटना अभ्यासावी, म्हणजे लक्षात येईल की आजकाल पाश्चात्य मॅनेजमेंट स्टडी पेक्षा आपल्याकडे असलेलं शिवचरित्र प्रॅक्टिकल रित्या अभ्यासले तरी भरपूर आहे..
अफझुल खान हे एक प्रकरण इथे उदाहरण म्हणून आहेच, कि कोणत्याही परिस्थिती समोर जाताना काय काय तयारी करून जावं लागतं..
जेव्हा अफझुल रयत मारत झोडत होता, तेव्हा देखील शिवराय लगेच युद्धाला आले नाहीत तर ते योग्य वेळ येण्याची वाट पाहत राहिले.
आणि दुसऱ्या बाजूला असलेलं लोक आणि गडकिल्ले ह्यांची उत्तम व्यवस्था लावत राहिले..जे त्यांचं काम होत ते करत राहिले..
एवढंच काय तर त्यांच्या धर्मपत्नी सईबाई ह्यांच्या मृत्यूनंतर देखील ते अफझुल स्वारी साठी तयार झाले, ह्यात त्यांचे Dedication पहा !!
कोणतेही इमोशनल कारण नाही की काही नाही, कारण तेवढ्या वेळात अफझुल जावळीच्या जंगलात म्हणजेच इतक्या दिवस केलेल्या प्रयत्नात आपसूक हजर झाला होता..
अफझुल चे हजर होणे, होय हजर होणेच..कारण तो जावळीत आला नव्हता तर त्याला आणला होता..
तर हे सर्व यश शिवरायांच्या कुटणीतीचे आणि त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या राजकीय वकिलांचे होते..
आपण ह्याला टीम वर्क म्हणू हवं तर..

हा तर जेव्हा अफझुल आला तेव्हा देखील लगेच जाणे म्हणजे उतावळेपणा तो देखील नको होता..संयम इथेच दिसतो..
त्याची जरा बडदास्त ठेवली गेली, पण त्या काळात त्याच्या लष्कराची इथ्यांभूत माहिती रोज गडावर कळत होती..
प्रतिस्पर्ध्याच्या सर्व हालचालींची माहिती ठेवली जात होती.
प्रथम भेटीत तो हि काही काळच मिळणार होता, त्यातच सर्व काही करायचं होत. आणि प्लॅन तयार होताच कि खानाला मारायचे आहे जिवंत नाही सोडायचे..
त्यामुळे तश्या पद्धतीने तयारी सुरु होती, भेटीला जाणारे वकील अगदी खानाच्या अंगाखांद्याचे पण माप अचूक सांगू शकत होते..
आपण ह्याला Analysis म्हणा हवं तर..
सगळं ठरलं खानाला भेटायला जाताना सोबत कोण असेल त्याने काय करायचं, ह्याची उजळणी झाली..
प्लॅन b सुद्धा तयार होताच, कि जर ह्यात शिवरायांना दगा झाला तर शंभूराजे गादीवर बसतील आणि माँ साहेबांच्या आदेशाने स्वराज्य चालेल..
ठरल्याप्रमाणे भेटीला जाताना शस्त्र बाजूला ठेवावी लागतील म्हणून बिचवा, कट्यार आणि वाघनखं होतीच..पण अंगात चिलखत पण चढविले..
संपूर्ण तयारी ह्यालाच म्हणतात, एकही गोष्ट सुटली नाही पाहिजे..
समोर भेटीला गेल्यावर ऐनवेळी जर काही दगा फटका होऊ नये ह्यासाठी सर्व तयारी..
जिथे भेट होणार होती ती जागा जवळ येताच सर्व अंगरक्षक दूर झाले आणि केवळ खान आणि शिवराय एकत्र आले..
साहजिकच दोघांच्याही मनात एकमेकांना मारण्याचेच प्लॅन होते, पण कसे मारायचे ह्याची तयारी शिवरायांनी केली होती .
वाघनखं विष लावून आणली होती, त्यामुळे त्याच्या वाराने खान मरणार होता..
एकमेकांवर वार झाले, एकाचा वार यशस्वी झाला दुसऱ्याचा अयशस्वी !!
तेवढ्यात खानाचा अंगरक्षक धावत येऊन वार करणार तेवढ्यात जिवा महालांचा वार वर्मी लागून तो पडला..
इतके करून देखील अगदी काही क्षणात सर्वाना सोबत  घेऊन लष्करातून बाहेर पडणे सोपे नव्हते..
पण ते शक्य झाले, कारण प्रत्येकाला माहित होते काय करायचे..जे सांगितलं तेवढंच आणि तेच करायचं..

जे कुणाला जमलं नाही, ते शिवरायांनी करून दाखविले..अफझुल सारख्या सेनानी ला समोरून ठार मारले..ज्याने औरंगजेबाला सोडले नाही त्या अफझुल खानाला शिवरायांनी हाताने संपविले असे सगळेच म्हणतात..
पण नाही, त्याला शिवरायांनी एकदम व्यवस्थित शांत डोक्याने संपविले..

Team मॅनेज कशी करावी
Maximum use of available resources
Team spirit
Analysis
Ready with alternative plans

अजून बरंच काही, हे सर्व केवळ ह्या अफझुल प्रकरणात आहेच पण अजूनही खूप लहान सहन गोष्टी आहेत ज्या आजच्या काळात देखील आपणांस खूप उपयोगी येतील..
खरं तर ह्याला आपण #शिवप्रताप म्हणू शकतो !!

©नितीन बबन शेंडगे

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

मोकळा श्वास !!

सर्व काही आलबेल सुरु आहे असं वाटत असताना अचानक काही तरी घडतं आणि मन सुन्न होऊन जातं.
अशीच सुन्न करणारी घटना जवळपास महिन्याभरापूर्वी मुंबई मध्ये घडली, एल्फिन्स्टन स्टेशन ला चेंगरा चेंगरी होऊन लोक मृत्युमुखी पडले.
हे सगळं जेव्हा कळलं तेव्हा एक धक्का बसला, आणि जेव्हा त्या घटनेचे फोटो आणि विडिओ पहिले तेव्हा तर कळायचे बंद झाले. काहीच कळेना कि काय होतंय.
गर्दी मुंबईला नवी नाही, किंबहुना हिच मुंबई लोकल ची ओळख आहे म्हटलं तरी वावगे ठरू नये. पण जेव्हा ह्याच लोकल मधून उतरून बाहेर जाताना किंवा लोकल पकडायला स्टेशन मध्ये येताना गोंधळ उडून जी चेंगरा चेंगरी झाली त्यात मृत्यू यावा, ऐसे कैसे घडावे ?? काही कळायला मार्ग नाही ..
नेहमी प्रमाणे मुंबईकर मदतीला धावलाच, कारण शेवटी कुणीतरी हे करणं आहे.
काही लोक प्राणास मुकले, आणि मग सुरु झाला खरा खेळ !!
मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा, ह्यात आपले मीडिया , राजकारणी ह्या लोकांबरोबर आपण प्रत्यक्ष स्वतः देखील येतो आहे..
कारण सोशल मीडिया वरील काही सो कॉल्ड विचारजंत आपली अक्कल पाजळायला लागले, कि जरा गर्दी झाली तर स्थिर विचार करायचा सोडून धावत का बसले , हे का केलं ते का केलं वगैरे.
आणि मीडिया आणि राजकारणी लोकांनी आरोप आणि प्रत्यारोप सुरु केले.
सरकारनं नेहमीप्रमाणे रोख मदत वगैरे जाहीर केली.
पण पुढे काय ??
हे इथून पुढे घडणार नाही, ह्याची शाश्वती कोण घेणार ?
मुंबई मध्ये प्रत्येक स्टेशन वर कमी अधिक प्रमाणात गर्दी आणि चेंगरा चेंगरी चा धोका आहेच.
कारण जी स्टेशन्स आणि पादचारी पूल आहेत, ते त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकांचा बोजा घेऊन आहेत. तीच गत मुंबई लोकल ची.
मग ह्यात एका राजकीय पक्षाने मोर्चा काढला, काय विषय होता मोर्चाचा ? तर जी घटना घडली ती पुन्हा घडू नये ह्यासाठी उपाययोजना.
आता खरा मुद्दा आला आहे,
रेल्वे प्रवासी संघटना ह्या गोष्टी वेळोवेळी रेल्वे मुख्यालयाला सूचना देत असते, पण त्याचा म्हणावा तेवढा विचार केला जात नाही. तेथील लोक केवळ निवेदन स्वीकारून गप्प बसतात.हा आजवरचा अनुभव.
सगळ्यात जास्त उत्त्पन्न देणारी मुंबई लोकल, जेव्हा घ्यायची वेळ येते तेव्हा मात्र सगळ्यात कमी तिच्या पदरात पडतं.
मग रेल्वे प्रवासी संघटना आणि त्यांचे सभासद ह्याचे ऐकत कोण बसणार ?
अश्या वेळी स्थानिक राजकीय पक्षाने रेल्वे प्रवासी संघटनेला सोबत घेऊन एक मोर्चा आयोजित केला. त्या मोर्चाचे नेतृत्व जरी राजकीय पक्षाने केले असले तरी मुद्दे हे प्रवाशांचे होते, त्यातील बहुतेक हे कित्येक वेळा निवेदन देऊन देखील रेल्वे मुख्यालयाच्या ऑफिस मध्ये केवळ रद्दी मध्ये पडून होते.
त्या मध्ये एक मुद्दा असाही होता की, प्रत्येक रेल्वे स्टेशन च्या बाहेर आणि काही प्रमाणात पादचारी पुलांवर जे विक्रेते असतात त्यांचं काय ?? कोण असतात हि लोकं ? कोणत्या जाती धर्माची ?? कोणती भाषा बोलतात ??
कारण जर स्टेशन परिसरात आपण कोणताही व्यवसाय करू शकत नाही, ज्या लोकांना परवाना आहे तेच केवळ करू शकतात.आणि प्रत्येक स्टेशन च्या बाहेर तर बापरे , अरे स्टेशन शोधात यावं लागतं कधी कधी..
तर हे असं सगळं आहे, पण अचानक मागील काही दिवसांपासून सगळे स्टेशन्स एकदम मोकळे मोकळे वाटायला लागले, एकदम ऐसपैस !!
तेव्हा कळलं की अरे स्टेशन्स तर खूप मोठे आहेत आणि पादचारी पूल पण तेवढेच मोठे आहेत.
फक्त जे व्यवसाय सुरु होते, ते बाहेर काढल्यामुळे एवढं मोठं मोठं वाटायला लागलं.
मग आता मुंबईकर पण खुश झाला अरे हे सगळं होऊ शकत होत तर मग आधीच का नाही झालं ? का सरकार किंवा महापालिका किंवा रेल्वे मंत्रालय ह्यांना हे सुचलं .
हे सर्व घडायला नेहमी कायदा हातात का घ्यावा लागतो लोकांना ? त्याचबरोबर मग काही चांगलं घडत असेल तर त्याला विरोध हि होतोच.
हे जे अनधिकृत फेरीवाले आहेत, जे स्टेशन्स आणि पादचारी पुलांवर व्यवसाय करतात ते म्हणे शासकीय कर्मचारी वर्गाला हफ्ता देतात.
हे सगळं सांगायचा मुद्दा असा आहे की, "राज ठाकरे" ह्या एका व्यक्तीने आणि त्यांचा "मनसे" ह्या पक्षाने केलेल्या आंदोलनामुळे ह्या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
आंदोलनं वगैरे मुंबई ला नवीन नाहीत, पण स्वतःच्याच शहरात स्वतः मुंबईकराला हे अनधिकृत फेरीवाले हाकला म्हणून आंदोलन करावे लागतेय हे मात्र चुकीचं आहे.
त्यात राजकीय लोकांनी तरी सामान्य माणसांचा जरा विचार करावा, कारण आमचा रोजचा प्रवास हा ह्याच रेल्वे ने होतो.
असो सध्या काही दिवस तरी स्टेशन्स मोकळी आणि ऐसपैस वाटत आहेत, त्याबद्दल तरी "मनसे" ह्या पक्षाला धन्यवाद द्यायला हरकत नाही.
कारण एक राजकीय पक्ष असून देखील सामाजिक मुद्दे उचलून लोकांची होणारी तारांबळ काही प्रमाणात का होईना कमी केलीत. नाहीतर आमचा कैवारी म्हणवून घेणारा वाघोबा अजूनतरी गुहेतच आहे.
आता हे सगळं वाचून तुम्ही सर्व प्रमाण करू नका कि मी मनसे ह्या पक्षाचा कार्यकर्ता वगैरे आहे, मी एक सामान्य मुंबईकर आहे जो ह्या पक्षाने केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देतोय कारण त्यामुळे काही प्रमाणात का होईना आज आपले स्टेशन्स "मोकळा श्वास" घेत आहेत.