मुंबई लोकल ही मुंबई मध्ये प्रवासाचे एक महत्वाचे साधन आहे, थोडक्यात मुंबई की दिल की धडकन !!
धडकन रुक गयी, तो मुंबई रुक गयी..
तर असे हे लोकल चे जाळे संपूर्ण मुंबई उपनगर, नवी मुंबई ते दूर तिकडे आसनगाव आणि पालघर डहाणू पर्यंत पसरले आहे.
त्यामुळे लोकांची प्रवासाची सोय तर चांगली झाली आहेच, आणि वेळ पैसा वगैरे सगळे वाचत आहे.
आता ह्या लोकल चे ही प्रकार आहेत; हार्बर आहे(छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल), सेंट्रल आहे(छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आसनगाव आणि खोपोली वगैरे, वेस्टर्न आहे(चर्चगेट ते डहाणू), ट्रान्स हार्बर आहे(पनवेल ते ठाणे).
तर हे असे लोकल चे जाळे सामान्य मुंबईकरांसाठी रोज येजा करण्याचे साधन आहे.
क्षमतेपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट माणसे वाहून देखील क्वचितच कधीतरी मुंबई ला धोका देणारी हि वाहिनी..
तसा आमचा प्रवास नेहमीचाच बोरिवली ते चर्चगेट, एकदम रेग्युलर.
परंतु ह्या रविवारी मात्र काही कामानिमित्त उलट्या दिशेला प्रवास करण्याचा योग आला.
म्हणजे बोरिवली ते विरार ह्या दिशेला, एकतर सोमवार ते शनिवार हा प्रवास म्हणजे एक दिव्यच असते.
भयानक वाढलेली लोकसंख्या आणि लोकलचा एकमेव आधार ह्यामुळे त्या लोकल ची अवस्था आशिष नेहरा सारखी झालेली असते. त्याला तुम्ही खेळवू ही शकत नाही आणि बसवू ही शकत नाही.
तर ह्या रविवारी नालासोपारा ह्या गावी जाण्याचा योग आला होता(हो गावच).
दुपारी १.१५ ला बोरिवली हुन विरार ला जाणारी गाडी पकडली, आणि कसे बसे आत गेलो..आणि काय ती गर्दी !! बापरे लोकांना रविवार वगैरे काय आहे की नाही ही शंका आली. चर्चगेट ते बोरिवली आणि जास्तीत जास्त भाईंदर पर्यँत लोकल ह्या मुंबई साठी असतात, बाकी सर्व उत्तरप्रदेश, बिहार आणि काही प्रमाणात बंगाल ह्या लोकांना आंदण दिल्या आहेत, हे माझे स्पष्ट मत आहे.
नुसते पब्लिक ते पण कसही बसले आहे, त्यांना काही पडलेली नाही..
हळूहळू गाडी पुढे जात होती, आणि वेगवेगळ्या प्रकारची तेलं लावलेली डोकी समोर येत होती..
डोकं गरगर करायला सुरुवात झालीच होती, वसई स्टेशन येईपर्यंत जरा गर्दी कमी झाली आणि बाहेरील हवा आणि तेलांचा उग्र वास ह्यांनी एकदम वातावरण भारून टाकले होते.
नायगाव येताच दोन चार लोक चढले आणि उतरले. गाडी पुढे निघाली, तसे अचानक सगळे लोक घाई करायला लागले, मग लक्षात आले की पुढील स्टेशन "नालासोपारा".
गाडी स्टेशन ला लागली असता, एकदम लोकांचा लोंढा गाडीच्या बाहेर फेकला गेला. पूर्ण गाडी खाली झाली, काही मोजकेच लोक होते गाडी मध्ये. बाहेर येताच पाणी शोधावे म्हटलं, मग एक उसाचा रस चा स्टॉल दिसला. सरळ गेलो आणि म्हटलं "भाय, दो प्लास्टिक ग्लास मै देना" , जरा शांत झालो पण समोर पाहून दचकलोच..
कारण समोर एक फोटो होता आणि त्यावर लिहिले होते आमचा अभिमान, फोटो होता स्व.अशोक कामटे यांचा..
कारण ते उसाचे रस काढणारे पुरंदरच्या जवळचे होते, मग अजून दोन ग्लास ची ऑर्डर दिली आणि तिथून काढता पाय घेतला.
नालासोपारा पश्चिम ला स्टेशन च्या बाहेरच मार्केट आहे, सगळ्याच प्रकारचे.संध्याकाळी गेलात तर माणसांच्या भावनांचे आणि दिवसभर गेलात तर भाजी आणि मासळी.
बाहेर आलो आणि रिक्षा स्टँड वर आलो, तसा एक भयानक वास आला आणि सोबत असलेल्या मित्राने अक्षरशः खालीच बसकण मारली. दोन चार शिव्या देऊन म्हणाला कसला वास आहे, मला तरी कुठे माहीत आहे म्हटलं कसला आहे. शेअर रिक्षा मुळे वास अजून सहन करावा लागत होता.
काही वेळातच रिक्षा भरली आणि आमचा त्रास संपला, आणि एकदाचे आम्ही इच्छित स्थळी पोहोचलो.
झाले एक भाग पार पडला, तिथे गेल्यावर आमचं काम आटोपलं आणि बोलता बोलता तोच विषय निघाला की स्टेशन परिसरात इतका सुंदर वास कशाचा येतो ??
तेव्हा त्याने संगीतले की भाज्या आणि मासळी कुजून त्याचा वास येत असतो..मी म्हटलं मग त्याची साफसफाई कोण करतं की नाही ? म्हणाला जागा रेल्वे ची आहे करत असतील..
असो काम आटोपून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो, पुन्हा स्टेशन ला आलो आणि त्या वासाने पुन्हा फ्रेश झालो..
एकदाचे स्टेशन ला आलो आणि पाहतो तर हे लोकांचा पूर आलेला..नेहमी लोकल चा प्रवास करणारा मी पण बोललो की ही ट्रेन सोडुया..
पण शेवटी मनाचा हिय्या करून करून धक्के खात गाडीत चढलो, आणि मी जणूकाही यूपी,किंवा बिहार ला आलो आहे असा भास झाला...
कारण गाडीत सगळा प्रकारच तसा होता, मोठी मोठी कुटुंब आणि त्यांचे सर्व सामान ह्यांनी नवीन लोकलचे संपूर्ण चित्र बदलून टाकले होते. वेगवेगळ्या तेलांचे सुवास सर्वदूर पसरून राहिले होते..
पुरुष स्त्रिया ह्या आपल्याच बापाची गाडी असल्यासारखे एकदम पसरून बसले होते..
त्यात काही युवती होत्या लहानपणी चे ड्रेस घालून आल्या होत्या, त्यामुळे त्यांचे नखरे सांभाळणारे आणि त्या ह्यांचा एक विभाग होता आणि त्या विभागाला आपला धक्का लागेल ह्या विचाराने काही काका अंग चोरून उभे होते.
एक लहान बाळ समोरील व्यक्तीचे केस उपटत होते आणि हसत होते.
एक सरदार जी होता, सोबत असलेल्या दोन युवतींमुळे जास्तच कोमेजून गेला होता..
तर अश्या प्रकारे एकदम नवीन असलेल्या लोकलचे रुपडे नालासोपारा ने बदलून पॅसेंजर गाडी करून टाकली होती..
आठवड्यातील इतर दिवशी देखील प्रवाशांची सर्वात जास्त चढ उतार ह्याच स्टेशन वर होते.
अतिशय व्यस्त आणि "सुवासिक" असे नल्ला सोपारा !!