सोमवार, २० मार्च, २०१७

नेरळ माथेरान - प्रवास

तशी तयारी चालू झाली होतीच, पण पहिल्यांदाच ऑफिस च्या ग्रुप सोबत ट्रेक चा प्लॅन झाला होता.
एकूण ८ जण तयार झाले, शुक्रवारी रात्री शेवटची कर्जत लोकल पकडून नेरळ ला जायचं आणि मग तिथून नेरळ ते माथेरान संपूर्ण ट्रेक..
हा हो करता करता शेवटी नेहमीप्रमाणे १ मेंबर गळाला..
धावत धावत येऊन दादर ला आम्ही आणि ट्रेन सोबतच प्लॅटफॉर्म वर..
शेवटी एकदाचं झालं सुरु, गाडी निघाली. ठाणे येथून तीन जण आणि डोंबिवली आणि कल्याण येथून एक एक जण..
कल्याण ला सगळे एका डब्यात एकत्र आले आणि ट्रेक मास्टर चेतन ने सगळ्यांना मार्गदर्शन सुरु केलं.

रात्री एक वाजता नेरळ ला उतरलो, आणि स्टेशन पासून सुरुवात झाली..हळू हळू चालत आणि बोलत गावाच्या बाहेर आलो. आणि इतका वेळ दबून राहिलेला घाम बाहेर यायला लागला..

मग पहिला ब्रेक घेतला, तिथे जरा पेट पूजा आणि पाणी वगैरे झाले..इकडच्या तिकडच्या गप्पा मारत चांदणं अनुभवत चालत होतो. आणि जुम्मा पट्टी च स्टेशन आलं, तिथून घाटरस्ता आहे.
अवघ्या काही वेळातच दुसरा ब्रेक घ्यावा लागला, मग परम ने आणलेलं गुलाब सरबत चा आस्वाद घेतला..
पुन्हा मार्गक्रमण सुरु, माथेरान ची मिनी ट्रेन चा रस्ता मध्ये मध्ये दर्शन देत होताच..
चांदणं सोबत होतंच, आणि त्या शीतल चांदण्यात अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या..पुन्हा एका ब्रेक ची गरज भासली, कारण सरळसोट उभी चढण होती..
अवघ्या दोन तीन मिनिटांचा ब्रेक घेऊन पुन्हा चढाई सुरु केली..रात्रीच्या काळोखात कुठवर जायचंय कळत नव्हतं, म्हणून अंदाज येत नव्हता..
आता मात्र सगळ्यांचा धीर सुटला आणि एका नागमोडी वळणावर बसकण मारली..
जवळपास ७०% चढण पार झाली होती..अतिशय सुंदर असा नैसर्गिक वारा आणि शीतल चांदणं ह्यामुळे जरा सुस्ती आली..निवांतपणे पेटपूजा करून घेतली..ह्यामध्ये लसूण शेव ह्या प्रकाराचा पूर्ण बळी गेला..
आता मात्र ट्रेक मास्टर चेतन ने सगळ्यांना सांगितलं की हे फायनल आहे, आता स्टॉप नाही..
हळू हळू वर आलो, आणि शेवटची चढाई पाहून मात्र पुन्हा अवसान गळाले.. एकदम नागमोडी आणि खडी चढण पाहून मात्र काहीच सुचेना..पण एकमेकांना साथ देत, मजाक मस्ती करत कसे बसे माथेरान ला दस्तुरी नाका ला पोहोचलो...
वर पोहोचलो तेव्हा सकाळचे ४ वाजले होते..
चेतन ने सर्वांना सांगितलं की झोपा आता, सकाळी आपण सूर्योदय पहायला जाऊया..पण झोपा ?? कुठे ?? कशावर ??
ह्याचा विचार करायला वेळ कुठे होता, पेपर अंथरून तिथल्याच कट्ट्यावर तंद्री लागली...
मधेच रोहित येऊन पुरणपोळी पाहिजे का असे विचारून गेल्याचं अंधुकस आठवत होतं..
पण कशाचं काय, एकदम सुम्म झोपलो होतो..
एवढ्या चांगल्या झोपेचं खोबरं कुणाच्या तरी ओकाऱ्या घालण्यामूळे  झालं..
ते तिकीटबारी वरील काका झोपेतून जागे झाले होते, आणि त्यांनी तोंड धुवायचा कार्यक्रम सुरु केला होता..
पुन्हा मात्र काही झोप लागेना, थंडी जाणवायला लागली होती..सकाळचे ६ वाजत आल्यावर सर्वांना उठवले आणि मग ठरवलं की आता सूर्योदय पाहायला जाऊया..पण कुठे ??? माहित नाही..तिथे एकाला विचारलं तर तो म्हणाला की दोन किलोमीटर लांब आहे..म्हटलं नको बाबा..तेवढ्यात ओकाऱ्या घालणारे काका म्हणाले अरे इतक्या लांब कशाला जाताय, तिथे पार्किंग च्या जरा पुढे जा तिथून पण चांगला दिसतो कि..
आणि मग सूर्यदेवाची वाट पाहायचा कार्यक्रम सुरु झाला.. काही वेळातच त्यांनी दर्शन दिले..
तिथे जरा फोटोग्राफी वगैरे झाली..मग पुन्हा मोर्चा आला जिथे रात्री झोपलो होतो तिथे, तेच काका पण आता मात्र तिकीट मागत होते..
७ तिकिटं घेतली आणि माथेरान नगरी मध्ये प्रवेश केला....
माथेरान...
मुंबई च्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं थंड हवेचं ठिकाण...आणि इथंच आहे झुकझुक गाडी(होय आपण तिला तेच म्हणूया)..
प्रवास आणि सामानाची संपूर्ण वाहतूक अजूनही पारंपरिक साधनांनी होते..
तर सकाळी सूर्यदर्शन आटोपून आम्ही रात्री झोपलेल्या जागेवर परत आलो, तर तेच ओकाऱ्या वाले काका मस्त कावुबॉय हॅट घालून तिकीट फाडत बसले होते..सगळ्यांची तिकिटं घेऊन जसे प्रवेश करतो झालो, तसा दिवसाचा कार्यक्रम काय असावा ह्यावर चर्चा सुरु झाली..चेतन मार्गदर्शन करत होता.शिबा नेहमीप्रमाणे आपल्याच मस्तीत गाणी म्हणत होता.
जसे माथेरान कडे जायला निघालो तसे पाहिले स्वागत केले ते तेथील वाहतुकीचे साधन असलेल्या प्राण्याने होय प्राणी..घोडा !!
म्हटलं बापरे एवढ्या उंचीवर घोडा फिरवायला आपण काय शंभूराजे आहोत की काय.
चेतन म्हणाला आपण पाहिले मार्केट मध्ये जाऊया, तिथून पुन्हा काही पॉईंट्स आहेत ते पाहून मग दुपारपर्यंत परत फिरायचे.
मग मोर्चा निघाला मार्केट ला, लाल लाल मातीमधून चालताना गावची आठवण येत होती..दोन तीन मिनिटातच  रेल्वे स्टेशन ला पोहोचलो..
सध्या तेथील गाडी बंद आहे, पण रेल्वे चे रुळ आणि त्याच्याबाजूच्या रस्त्यावर आमचा प्रवास सुरु झाला..
आणि अचानक एकदम नवीन नवीन कपडे केलेले गावातील लोक दिसायला लागले.बाया बापड्या एकदम सजून धजून संपूर्ण कुटुंबकबिला घेऊन लगबगीने कुठेतरी जात होत्या. एकाला विचारले असता कळले की गावात दोन लग्न आहेत, आणि इथे गावाकडे प्रत्येक घरी निमंत्रण असते.
आमचा काफीला तसाच पुढे चालत होता, रस्ता अतिशय सुंदर आणि संपूर्ण झाडांनी वेढलेला होता.
ह्या रस्त्यांवरून झुक झुक गाडीतून जाताना किती मजा येईल ह्याची कल्पना करत चाललो होतो. फोटो काढणे चालू होतेच, मधेच एकदा पोट पूजा झाली.
जवळपास २ ते २.५ किलोमीटर चालल्यानंतर एकदाचे मार्केट दिसले.
माथेरान स्टेशन ला आलो, गाडी बंद असल्यामुळे स्टेशन वर तसे काहीच काम नव्हते, पण फोटोसेशन झाले. तेथील एटीएम मशीन सोबत खेळून झाले, पण तिने पैसे काही दिले नाहीत. आता मात्र खूप भूक लागली होती, सगळेच दुष्काळातून उठल्यासारखे दिसत होते.
चेतन ने एका ठिकाणी नेले, शेलार बंधूंचे ते उपहारगृह होते. एकदम टापटीप आणि स्वच्छ.गेल्या गेल्या म्हटलं, शेलारमामा एकदम झणझणीत मिसळ द्या. नेहमीप्रमाणे दणदणीत नाश्ता झाला, कारण चवच तशी होती..
मग आता पुढे काय, हो नाही करत करत पुढचे पॉईंट करायचे ठरले.कारण सगळे नवीन होते आणि इतके चालायचे असे त्यांच्या मनी ध्यानी नव्हते. पाय ओढत ओढत निघालो, एलिझा पॉईंट कडे.
तो तिथून २ किलोमीटर होता, एक किलोमीटर गेल्यावर एक फाटा आहे, तिथून शरलॉन तलावाकडे एक रस्ता जातो, एक इको पॉईंट कडे आणि एक एलिझा पॉईंट कडे.
समोरच इको पॉईंट आहे म्हणून तिथेच गेलो. समोर जाताच एकदम वेगळाच फील येतो, एका टोकावर आहे इको पॉईंट.
समोर विशालकाय प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग, एका बाजूला एलिझा पॉईंट..अतिशय सुंदर असे दृश्य.
काही वेळ तिथे असलेल्या जागेवर बसलो, मग जरा फोटोसेशन झाले. तिथेच असलेल्या सरबत वाल्या मित्राकडे जरा बोलत बसलो, मग गोळा आणि सरबत ह्यांचा ब्रेक झाला.
आता मात्र एलिझा पॉईंट कडे जायची तयारीच नव्हती, पण चेतन ने सर्वांना समजावून तिकडे नेलेच..
पण तिथे असलेला नजारा पाहून मात्र आपण इकडे आलो, ते बेस्ट झाले असेच वाटले.
एकदम सुंदर जागा आहे, अतिशय शांत.
तिथेच एका ठिकाणी लिंबू सरबत घेतले, आणि १० मिनिटं आराम केला.
आता मात्र शेवटचा पॉईंट म्हणजे शरलॉन तलाव, निघालो तिकडे.
पुन्हा जवळपास २ किलोमीटर चा प्रवास, तिथे एक किस्सा झाला. जसे जवळ पोहोचलो, तिथे एका ठिकाणी काकडी घेतली खायला आणि खात खात जात असताना आपले पूर्वज आले की धावून अंगावर.मी आणि नितेश चेतन च्या मागे लपून बसलो.
चेतन च्या हातात बेचकी होती, त्याने ती उगारली तसं समोरून पण तसाच काहीतरी झाले.हळूहळू बाजूला होत त्या पूर्वजाने आमचा रस्ता सोडला.
आणि आम्ही एकदाचे शरलॉन तलाव येथे पोहोचलो.
एकदम सुंदर परिसर, एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला पसरलेला तलाव आणि मधेच हि जागा.तिथेच गावातील देवाचं मंदिर.
तिथेच आहे, कदम बंधूंचे प्रसिद्ध आणि चवदार असे हॉटेल.
तलावाच्या बाजूला टेबल लावून मस्त भजी आणि ताक ह्याचा आस्वाद घेत होतो, ताक तर अतिशय चवदार होते.  एकदम घरगुती.
थकवा कुठल्याकुठे पळून गेला होता.
जवळपास अर्ध्या तासाच्या ब्रेक मध्ये निवांतपणा मिळाला, पोटाला हि आराम मिळला.
आता परतीचा प्रवास सुरु झाला, शेवटचा टप्पा ४ किलोमीटर.
सगळे नुसते सुटले होते, घरी जायचं हा एकच विचार.
मार्केट मध्ये आल्यावर काही वेळ गेला, खरेदी वगैरे ला.
आणि ३.१० ला जिथून सुरूवात केली तिथे पार्किंग मध्ये पोहोचलो.
टॅक्सी पकडून डायरेक्ट नेरळ स्टेशन, येताना तो रस्ता पहिला जिथून चालत आलो होतो.टॅक्सी ड्राइवर हा मायकल शुमाकर चा नातलग होता, कारण त्या घाटात डोळे फिरत होते, आणि हा गाडी फिरवत होता.
शेवटी एकदाचे स्टेशन ला आलो !!
असा हा जवळपास २० किलोमीटर चा पायी प्रवास केवळ सर्वांच्या सहकार्याने पार पडला.
न विसरता येण्याजोगा एक सुंदर अनुभव, आणि माथेरान म्हणाल तर बेस्टच !!