बुधवार, २२ एप्रिल, २०१५

महात्मा घेता का ,महात्मा ??

आज काल आरक्षण विषयी ची बातमी दर दोन दिवसाआड येते . कितीतरी संघटना, पक्ष त्यावर भांडत असतात. हे सगळे चालू असताना कुणी त्यांची पत्रक किंवा जे ब्यानर लावले जातात त्या कडे पाहिले आहे का ? कोणत्या ना कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीचे चित्र त्यावर असते.
त्याचा अर्थ काय ?

आज आपण कितीही पुढे गेलो तरी काही राजकीय पुढारी आणि समाजातील स्वताला श्रेष्ठ समजणारी माणसे आपल्याला जाती आणि धर्मा मध्ये वाटून टाकतात . कितीतरी मोठ्या व्यक्तींना ह्या लोकांनी एखाद्या जाती आणि धर्मामध्ये अडकवून ठेवले आहे. आणि आम्हीपण ते मान्य केले आहे .

खाली काही उदाहरणे देत आहे,

छत्रपति शिवराय : मराठा
महात्मा फुले : माळी
डॉ . बाबासाहेब आंबेडकर : बौद्ध
राणी अहिल्यादेवी होळकर : धनगर
लोकमान्य टिळक : ब्राम्हण

हि तर काही उदाहरणे आहेत , आमच्या मनावर हे सगळे इतके ठासवून भरले आहे कि काही साहित्यक पण जाती पातीचा उल्लेख करूनच ह्या सर्व व्यक्तींबद्दल लिहितात .

जर ह्या लोकाची चरित्र वाचली तर ह्यांनी मात्र कधीही जातीपातीला आपल्या मनात थारा दिला नव्हता . त्यांना एकच जात माहित होती , माणूस .

आज काल जर समजा मी वरील पैकी कुणाचेही गोडवे गावू लागलो कि लोक आधी माझी जात पाहतील.

कधी संपणार हे ?
आजही शाळेत जातीचा दाखला मागितला जातो , का म्हणून ? एका बाजूला जाती पाती संपवून टाका म्हणायचे आणि जिथून खरे संस्कार सुरु होतात त्या विद्यामंदिरात जात तपासायची .

वरील उल्लेख केलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत सर्व जाती धर्माची लोक होती. त्यांनी कधीही म्हटले नाही कि हा अमुक जातीचा आहे म्हणून ह्याला सोबत नको . मग आपण का ह्यांना जाती आणि धर्मात अडकवून टाकलेय ??

प्रत्येक वेळेस कुठल्या नि कुठल्या राजकीय स्वार्था साठी एखादे ऐतिहासिक व्यक्तिमत्व बळी जातेय.

सोमवार, २० एप्रिल, २०१५

नावात काय आहे ????

नमस्कार !!
नावात काय आहे , असे कुणीतरी म्हणून गेले आहे. पण खरेच का हो नावात काहीच नाही ????
खूप लोकांना आपल्या नावाचा अभिमान असतो, कारण काही ना काही असतेच हो. तसेच आपल्या गावाचा हि अभिमान असतोच, कितीही लहान गाव असू देत पण परमुलुखात त्याचे नाव निघाले की लई म्हणजे लई भारी वाटते . ह्या सोमवारी मुंबई वरून येताना गावाला जाणारी येष्टी मिळाली, म्हटले चला जावू त्याच गाडीने. लहानपण आठवले हो लगेच, प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच गाडीने गावाला जाणे होत होते. एकदम भन्नाट प्रवास असायचा, तो खंडाळ्याचा घाट, लोणावळा चिक्की आणि भिगवण ला जेवायला थांबणे… नुसता सुवर्णकाळ आठवत होतो.
सहप्रवासी मात्र पावसातील गांडूळ असल्यासारखा वळवळत होता. एकतर तो माज्या पेक्षा जास्त अवाढव्य होता, आणि महामंडळाच्या सीट इतक्या आकारमानाच्या लोकांसाठी नसतात. मी स्वताला गोगलगायी प्रमाणे आकसून घेत निद्रा देवीला जवळ केले. हळूहळू प्रवास चालू होता आणि त्याच्या एका प्रश्नाने मात्र गोगल गायीचा बैल झाला !!
भैया बॉम्बे वापस जाने के लिये शाम को आखरी बस कब है ?????
त्याने हिंदी बोलले किंवा मला भैय्या म्हटले त्याचा नाही तर त्याने मुंबई चा उल्लेख बॉम्बे केला ह्याचा.
ह्याच विषयावरून माझा खूप लोकांशी वाद झालेला आहे, ह्यांच्या काय बोबड्या वळतात काय मुंबई बोलायला ? आमच्या जुन्या ऑफिस मधील मार्केटिंग वाल्या गुज्जू सोबत तर रोज ह्या विषयावरून वाजायचे. ती नेहमी बॉम्बे असा नामोल्लेख करत आणि मी तिला चार गोष्टी सुनावत असे.
जास्त कशाला अजूनही काही लोकांना मुंबई पेक्षा बॉम्बे म्हणणे स्टेटस सिम्बॉल वाटते.
पण आम्ही अजूनही त्यांना चार गोष्टी सुनावून मुंबई म्हणा असे बोम्बलत असतो.
साला त्या एका प्रश्ना मुळे खंडाळा द्रुतगती महामार्गावर निद्रा देवी साथ सोडून गेली आणि त्या अजस्त्र मानवासोबत संवाद चालू राहिला. आणि त्या येष्टी मधील काही पाहनीय (प्रेक्षणीय नाही) स्थळ माज्याकडे विस्फारित नजरेने पाहू लागली.

हरलेला माणूस ?????????

मराठी सिनेमाना प्राईम टाईम दिला गेला आणि समस्त मंडळीना मिरच्या झोंबल्या. आता हि मंडळी कोण तर ज्यांच्या मुळे मल्टीप्लेक्स चालतात असे सगळे म्हणतात.
का तर ते १०० करोड चे सिनेमे देतात, आता हे १०० करोड कसे होतात तर तिकीट दर वाढवले कि झाले. पण जे लोक खरच मनापासून सिनेमा वर प्रेम करतात त्यांनी मात्र ह्या मध्ये लक्ष दिले नाही. त्यांना हि माहित आहे कि मराठी सिनेमा आता बदलला आहे, जर २ ते ३ करोड मध्ये बनणारा सिनेमा ३० ते ४० करोड कमवत असेल तर तो तथाकथित हिंदी सिनेमा वाल्यांच्या पोटात गोळा आणणारा आहे .
आणि आपल्या कडे नियम केले कि रडत राहणारे दक्षिण भारतात का रडत नाहीत ??????
महेश भट्ट (अतिशय पकाव) का रडत बसला नाही जेव्हा दक्षिण भारतात त्याच्या सिनेमाला चित्रपट गृह मिळाले नाही. जर कायदा असेल तर मग कुठेही जा प्रादेशिक भाषेला नेहमी प्राथमिक दर्जा हवाच.
जेव्हा महाराष्ट्रात असे म्हटले जाते तेव्हा देश तोडायला चाललेली पार्टी म्हणून मनसेची बदनामी केली गेली. पण जेव्हा हीच गोष्ट दिल्ली किंवा चेन्नई किंवा इतर प्रांतात होते तेव्हा कुठे जातात हे लोक ????????
आता मराठी सिनेमा चा मुद्दा आला आहे , क्रांती रेडकर दिग्दर्शित "काकण" या सिनेमाला प्राईम टाईम देण्यास मल्टीप्लेक्स वाले विरोध करत आहेत.
अश्या वेळी त्यांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री यांच्या कडे जायला पाहिजे होते, पण
त्यांनी राज ठाकरे यांच्या कडे गाऱ्हाणे मांडलेय .
ना ते सत्तेत आहेत ना त्यांच्या कडे कोणतेही पद आहे मग का ??
मराठी लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना सत्तेत आहेच कि मग ह्या हरलेल्या माणसाकडे का ????
जर समस्त महाराष्ट्राला वाटतेय ना कि राज ठाकरे काहीच करू शकत नाही मग त्यांच्या कडे जाण्यास काय कारण ??
मोदींनी अदानी ग्रुप सोबत काही मीटिंग केल्या कि ते देशाचे भवितव्य पाहत आहेत , हेच जर नाशिक मध्ये राज साहेबांनी केले तर काहीतरी झोल आहे, बरोबर ना ?? मी तुलना करत नाहीये, जर दोघांची पण पद बाजूला केली तर जे दोघांनी केल ते एक सारखच कि.
तरी पण हरलेल्या माणसाच्या मागे मेडिया वाले तर हात धुवून लागले आहेत, मागे आरे कॉलोनी च्या वेळेस हि तेच.
ज्या वेळेस मुंबई चा development प्लान आला त्या वेळेस नाक मुरडणारी लोकं, राज साहेबांच्या मीटिंग ला हजर.
इतके काय आहे तेच कळत नाहीये त्या हरलेल्या माणसात ………………
मला तुमच्या सगळ्यांकडून उत्तर अपेक्षित आहे !!!!

टोल भैरव !!

नमस्कार !!,
आज काल सगळीकडे टोल चा मुद्दा खूप गाजतोय. नुकताच सरकार ने काही टोल बंध केले आणि काही ठिकाणी तात्पुरती टोल माफी दिली .
मी सुरुवातीला स्पष्ट करतोय कि कोणत्याही राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मी हे लिहित नाहीये.
हा तर चला मग, ज्या वेळेस मनसेने टोल चा मुद्दा घेतला त्याच्या आधी आपल्यासारख्या सामान्य माणसाचे तरी लक्ष होते का कि आपण किती आणि का टोल देतो ?? कधीतरी आपण विचारले का रे बाबा किती दिवस टोल घेणार ?
कारण टोल चा झोल आपल्याला काही माहित नव्हताच (आता हि कळणार नाही), मुंबई पुणे द्रुतगती मार्ग हा सध्या तरी महाराष्ट्रातील एक उत्तम मार्ग म्हणता येईल जिथे आपण टोल देतो काही प्रमाणात का होईना ठीक आहे.
पण हीच गोष्ट पुणे ते कोल्हापूर ह्या राष्ट्रीय महामार्गाला लागू होत नाही , सरासरी ५० ते ६० किमी ला टोल आणि रस्ते तर काय केवळ एक बाजू सिमेंट चे आणि दुसरी बाजू डांबर. काय हे ??????
आणि टोल कशासाठी तर म्हणे रस्ते व्यवस्थित ठेवणे आणि त्यांची निगा राखणे.
अरे कशाला बनवताय, आहे तोच रस्ता केवळ वरून डांबर मारले जाते. Just Patching जसे काही ठिगळ लावले आहे.
एक साधा हिशेब , मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर समजा एका चारचाकी ला ५० रुपये टोल घेतला तर एका दिवसाला तिथून ५०० चारचाकी गेल्या (५०x ५००=२५००० रुपये रोज ) तर महिन्याला सरासरी २५०००x ३०=७५०००० रुपये मिळतात. वर्षाला ९०००००० रुपये.
हे केवळ एक उदाहरण आहे, रस्ता बांधून आता जवळपास १५ वर्ष झालीत. तरी पण वसुली चालूच आहे.
आणि अजून किती दिवस टोळ भैरव पाळायचे ?????

शुक्रवार, २० मार्च, २०१५

रक्तरंजित तुळापूर

अचानक निल्या चा (निलेश सोनवणे) फोन आला, म्हणाला काय रे ह्या वीकेंड ला पण घरी का ? मी म्हंटले नाही रे, इथेच आहे.  त्याने विचारले तुळापुर ला जावूया का ? अन लागलीच हो म्हणालो .

तुळापूर खूप मोठा इतिहास आहे ह्या गावाला, त्रिवेणी संगम इथेच झालाय , भीमा ,भामा आणि इंद्रायणी.

परंतु मला तुळापूर माहिती आहे ते संभाजी महाराजांमुळे, होय केवळ त्यांच्यामुळे. भरपूर लेखन झालंय त्यांच्यावर काही चांगले काही वाईट, आता इतिहास आहे तो लोक आपल्या माहिती प्रमाणे लिहितात . 

छावा अजून वाचून पूर्ण झालेले नाही, जसजसा कादंबरीचा शेवट येत जातो काय माहित पण पुस्तकाला हात लावण्याची हिम्मत होत नाही. आपोआप डोळ्यात अश्रू आणि क्रोध दोन्ही एकत्र येतात. किती यातना किती हाल झाले असतील आणि आपण एक सुई टोचली तरी दोन दिवस दुखतेय म्हणून रडत राहतो .  इतके हाल सहन करायला माणूस मनाने  आणि शरिराने खूप दणकट लागतो . तसे महाराज असतीलहि पण त्यांच्या सोबत असलेले कवी कुलेश यांचे काय ? एक कविमनाचा माणूस  आणि एक कविमनाचा राजा .  एकमेकांच्या सोबतीने खूप काही शिकले असतील .

पण मला अजूनही कळत नाहीये कि मला का हिम्मत होत नाहीये शेवट वाचायची. शेवट माहिती आहे पण तो ऐकून ,स्वतः अजूनही वाचलेला नाही .
एक राजा कि एक कवी कि एक धुरंधर सेनानी, कोण होते शंभू राजे ?

राजे होते तर मग इतके ग्रंथ आणि काव्य कसे लिहिले
कवी होते तर मग इतके हाल कसे सहन केले
धुरंधर सेनानी होते तर मग अचानक फितुरी होवून कसे सापडले

उत्तरे शोधतोय ह्या सगळ्या प्रश्नांची ,जेव्हा मिळतील तेव्हा पाहतो हिम्मत होतेय का शेवट वाचण्याची ........

गुरुवार, १९ मार्च, २०१५

सुरुवात पुणे



ऑक्टोबर २०१५, पुणे येथे नवीन रोजगार मिळाला आणि मुंबईकर तात्पुरता पुणेकर झाला . खूप दिवस पुण्याला येण्याची इच्छा होती ती पूर्ण झाल्यामुळे स्वारी खुशीत होति. पण हे सगळे पुण्यात पाय ठेवताच संपले, पक्का मुंबईकर पुण्यात लगेच रूळत नाही ह्याचा प्रत्यय आला.

सुरुवातीचे दोन तीन दिवस लय म्हंजे लय जड गेले. झक मारली आणि इथे आलो असे वाटले पण कसे आहे कि शेवटी तुम्हाला पुढे जायचे असेल तर adjustment करावी लागेतच (आणि हे मुंबईकरच करू शकतात, sorry पुणे only मुंबईकर ).  पण लगेच वीकेंड ला घरी मुंबई ला जावून आलो. हळू हळू हे routine झाले .

आणि मी देखील तात्पुरता पुणेकर झालो .