मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

पाणी झरत चालले आज आभाळ फाटले

पाणी झरत चालले आज आभाळ फाटले ,
पावसाला पावसाने वर ढगात गाठले ।।

किती छान ओळी  आहेत ह्या सौमित्र ह्यांच्या , पण आज मात्र ह्याच पाणसाने सगळ्यांना जागेंवरच गाठले आहे . धुंवाधार पाऊस, कि ढगफुटी कि अजून काय पण २६ जुलै ची आठवण झाली. सगळं जागेवर ठप्प. लोकल , विमान आणि रस्ते वाहतूक सगळं कुणीतरी स्टॅच्यू केल्याप्रमाणे एका जागेवर.

खरंतर ह्या वर्षी गणपती बाप्पा हा पाऊस सोबत घेऊनच आलेले , नुसती रिमझिम चालू होती. पण आता पाच दिवसांचे गणपती जाताना मात्र सगळ्यांना अक्षरशः रडवूनच गेले कि. म्हणले असतील दरवर्षी मला पाण्यात बुडवता आता ह्या वेळेस मी बुडवणार.

नुसता पाऊस आणि पाऊस , सगळे ऑफिसेस वगैरे  लवकर सोडलेले . शाळा वगैरे तर सकाळीच सुट्टी जाहीर. आम्हाला कळेपर्यंत दुपार झालेली मग काय आम्हा मजुरांची सुट्टीची वेळ ठरली ३.३०, आता ३.३० ला निघून घरी कधी जाणार कारण लोकल ने दुपारीच दम सोडला होता . आणि रस्तेही इतक्या सगळ्या वाहनांमुळे आणि पावसांमुळे दम्याच्या पेशंटप्रमाणे श्वास घेत होते.

ऑफिस मधून निघालेले बहुतेक लोक अर्ध्या रस्त्यांतून परत आलेले , तर काही मात्र दूर तिकडे पनवेल ला पोहोचले (त्यांना मात्र सॅल्यूट , कारण काहीही करून ते पोहोचले होते. )

आता काय करावे हा सगळ्यांचा प्रश्न होता ,काही जणांनी नेहमीप्रमाणे तेच ते मजुरी करायला सुरुवात केली, तर काही बाहेर गप्पा मारत होते, तर काही गाणी ऐकत होते.

लोकल मात्र अजूनही सुरु झाल्या नव्हत्या, बसेस चालू होत्या . टॅक्सी आणि रिक्षा वाले तसेच ओला उबेर वाले शक्य तितके प्रवासी वाहत होते.

ह्या मुसळधार पावसात देखील मुंबई चे "एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ " रूप दिसून येत होते. ठिकठिकाणी लोक शक्य ती माहिती देत होते , जेणे करून कुणाला त्रास होऊ नये. पोलीस नेहमीप्रमाणे आपले काम करत होते(खरच मानलं पाहिजे ह्यांना, आज त्यांचा अभिमान वाटत होता).

शेवटी निसर्गचक्रापुढें कुणीही मोठा नाही हेच खरे, आता मात्र बाप्पा ला एकच विनंती

तूच माझी आई देवा, तूच माझा बाप।।
गोड मानुनी घे सेवा ,पोटी घाली पाप ।।
चुकलेल्या कोकरा या, सूर्य दाखवाया ।।
घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया ।।